ESVC Super Helios

ESVC Super Helios Solar power is clean, renewable and cost effective, but it also needs time to develop & We need to bring sustainable energy to every corner.

31/12/2018

नवीन वर्षाचे संकल्प

नव्या वर्षाच्या सुरुवातीला जगात कोट्यावधी लोक कोट्यावधी संकल्प करत असतात. त्यातले फारच थोडे लोक ते संकल्प पूर्णत्वास नेऊ शकतात. अनेकदा तर पहिल्या आठवड्यातच संकल्पाला टाटा बाय बाय केला जातो. हे असे का होत असावे? आपल्यासोबत होऊ नये म्हणून काय करता येईल?

सर्वप्रथम आपल्याला आपल्याबद्दल थोडे जाणून घ्यावे लागेल. मला नेमकं काय हवंय हे शोधावं लागेल. जे काही हवंय ते नेमकं कशासाठी हवंय हेही समजून घ्यावे लागेल. बहुतांशवेळा आपण जो संकल्प करतो तो स्वतःसाठी नसतोच मुळी. तो इतरांना सांगण्यासाठी असतो. इतरांना सांगितले की तो संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान मिळते, लोक वाह वाह करतात आणि आपण मनातल्या मनात खुश होऊन जातो. खरे तर संकल्प पूर्ण झाल्यावर जे खरे समाधान मिळाले असते त्यात काही वेगळीच मजा असती. परंतु आपल्याला जर फक्त लोकांकडून ताबडतोब कौतुक हवे असेल तर कोण इतकी मेहनत करत बसणार? तेही पूर्ण ३६५ दिवस? छे हो.

९० टक्के संकल्प गळून पडण्याचे कारण हे इतकेच असते.

मग आता नक्की काय करायचे? तर आपल्या इच्छा, आपली स्वप्ने आणि आपली ध्येयं ह्यामधला आधी फरक जाणून घेतला पाहिजे. तीन्हीतला फरक कळला की संकल्प नक्की काय करावा आणि सिद्धीस कसा न्यावा हेही स्पष्ट होईल. इच्छा म्हणजे अपेक्षा. अनेकदा आपल्या इच्छा ह्या अशाच कुठूनतरी प्रकट होतात. आपल्याला काहीतरी आपोआप घडायला हवं असतं. आपण उशीरा घरातुन निघालो तरी ट्रेन, बस ही योग्य वेळेवर यावी. मला घसघशीत पैशाचे घबाड मिळावे, लॉटरी लागावी. मला सगळ्यानी छान छान म्हणावे, माझे कौतुक करावे. मला शहरातल्या, जिल्ह्यातल्या, देशातल्याच काय तर अख्ख्या जगातल्या सर्व लोकांनी ओळखावे. बायकोने चांगले वागावे, नवर्‍याने कौतुक करावे. बरेचदा तर अशा इच्छांसाठी आपली स्वतःची काही करायची तयारी नसते. असली तरी मनोबल इतके प्रबळ नसते की आपण ते घडवून आणू. जगभरात पहिल्या जानेवारीला जीमला जाईन, व्यायाम सुरु करेन म्हणुन संकल्प करणारे लोक महिना सोडा, अगदी आठवडापण तसे करु शकत नाहीत. कारण त्यांच्यात ती जीवाला पेटवून काढणारी आग नसते. फक्त काहीतरी सोपे, सहज असावे आणि त्यातून मोठ्ठे महत्त्वाचे घडावे अशी विचारसरणी म्हणजे आपल्या फुटकळ इच्छा. अशा इच्छांना संकल्पासाठी पात्र ठरवूच नये.

स्वप्ने म्हणजे काय? आपण प्रत्येक जण जन्माला येतो ते काहीतरी आपलं मूळ कारण घेऊन. मनुष्याच्या मनात काही सुप्त भावना असतात. जेव्हा त्या प्रखर होतात तेव्हा ती स्वप्नं म्हणवली जातात. ती पूर्ण होतीलच असे नसते परंतु जगण्याची आशा स्वप्नांवरच टिकून राहिलेली असते. स्वप्ने कधी सुस्पष्ट असतात, कधी अंधुक हळुवार मनाच्या खोल तळात लपलेली असतात. कोणाला जगाच्या सफरीवर जायचे असते तर कोणाला एवरेस्टच्या सर्वोच्च टोकावर पोचायचे असते. कोणाला प्रचंड श्रीमंत होऊन वेगवेगळ्या महागड्या कार्स आपल्या दाराशी असाव्यात असे वाटते तर कोणाला सर्व जीवन वंचितांच्या भल्यासाठी वाहून द्यावेसे वाटत असते. आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वप्नांची जातकुळी वेगवेगळी असू शकते. परंतु प्रत्येकाचे हे स्वप्न तितकंच अनमोल असते, त्याला कायम जपायला पाहिजेच. कारण कोणत्याही माणसाच्या अस्तित्वाला अर्थ देण्याचे महत्त्वाचे काम त्याची स्वप्नंच तर करत असतात.

पण आता ही स्वप्नं तर कधी अमूर्त असतात, कधी अप्राप्य होऊन बसतात. अशा स्वप्नांना आपण ध्येयात बांधू शकलो तर? तर मात्र संकल्पसिद्धीची शक्यता कित्येक पटीने वाढू शकते. म्हणजे आता सांगणे आलेच की ध्येय म्हणजे काय? ध्येय म्हणजे एका विशिष्ट कालावधीत विशिष्ट उद्देश ठेवून त्याचा विशिष्ट परिणाम साधून घेण्याचे परिमाण. ध्येय कधीच अंधुक, अमूर्त नसते तर सुस्पष्ट असते. त्याची कालमर्यादा निश्चित केलेली असते. ध्येयपूर्ती होईलच अशी खात्री केलेली असते. आज आपण जिथे कुठे आहोत, तिथून आपल्याला पुढे नक्की कुठे जायचे आहे ह्याचे स्पष्ट उत्तर म्हणजे ध्येय. उदाहरणार्थ, मला २०२० च्या जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला मर्सिडीज सी क्लास २५० ही कार विकत घ्यायची आहे. २०२५ च्या मे महिन्यात माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला मी नविन पाच बेडरुमचा प्रशस्त बंगला विकत घेणार. २०३० साली माझ्या उद्योगाचा टर्नओव्हर एक हजार कोटींवर असेल. माझा व्यवसाय आज फक्त महाराष्टात आहे तर पुढच्या वर्षी आणखी पाच राज्यात असेल व त्यापुढच्या वर्षी सर्व भारतात असेल. पुढच्यावर्षीच्या दिवाळीच्या सुट्ट्यांत मला दहा दिवस युरोपला कुटूंबासह दहा दिवसांचा हॉलिडेटूर करायचा आहे.

समजले का? बघा, ही ध्येयं कशी पटापट आकड्यांमध्ये, तारखेमध्ये आणि दर्जामध्ये प्रत्यक्ष बोलत आहेत. त्यामुळेच तर हे मोजता येते. मोजता आल्याने तुलनाही करता येते. ध्येयामुळे आपल्याला नेमके काय हवंय याची रुपरेषा, कालमर्यादा स्पष्ट होते. आपण ठरवलेले ध्येय साध्य केल्यावर स्वतंत्र अशी आपली स्वतःची ओळख निर्माण केल्याचे समाधान लाभते. संकल्पपूर्तीचे समाधान लाभते. स्वतःला सिद्ध केल्याची भावना आतून येते. लोक जेव्हा कौतुक करतात तेव्हा खरी आत्मिक शांतता लाभते.

म्हणूनच ह्यावर्षीचा संकल्प ठरवतांना, विचार करा, की मला नक्की काय हवे आहे, का हवे आहे, कधी हवे आहे, कसे हवे आहे. ते कोणत्या माध्यमातून मिळू शकते. कोण मला ते मिळवण्यास मदत करु शकते. कोण त्यात अडचणी निर्माण करु शकते. ह्या सर्व बाजूंचा विचार केला की आपल्या संकल्पाची पूर्ण कुंडली तयार होईल. ही कुंडली पुढ्यात ठेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कृती आखली गेली पाहिजे. आपले ध्येय खूप मोठे असेल तर ते तुकड्यात विभाजित करुन तेव्हढे भाग पूर्ण करत जायचे, बघा वर्ष संपेपर्यंत विनासायास आपला संकल्प पूर्ण झालेला असेल. बर्‍याच लोकांना वीस किलो, तीस किलो वजन कमी करायचे असते, परंतु त्याला वर्ष दोन वर्षे लागतील म्हणून ते विचारच सोडून देतात. कारण इतका वेळ आपण तग धरु शकणार नाही असे त्यांना वाटत असते. आपण अशा वेळी काय करायचे तर फक्त पुढचे पाऊल टाकायचे. प्रत्येक पाऊल टाकत जाईन एवढाच निर्धार करायचा. वेटलॉस असो की व्यवसाय असो की प्रचंड पैसा कमवणे की एखादी मोठी परिक्षा असो की आपले बिघडलेले नातेसंबंध सुधारायचे असो. छोटी छोटी पण सातत्याने टाकली जाणारी पावलेच अंतिम ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवतात.

२०१९ हे वर्ष जगात सर्वार्थाने खूप मोलाचे, महत्त्वाचे ठरणार आहे. ह्या क्षणी जगात जीवंत असलेल्या व श्वास घेत असलेल्या प्रत्येक मनुष्यप्राण्यावर हे वर्ष दूरगामी परिणाम करुन जाणार आहे. अशा गेमचेंजर वर्षासाठी तुम्ही फक्त तुमच्या निश्चित केलेल्या ध्येयाच्या दिशेने पावले टाकत राहण्याचा, त्यात सातत्य ठेवण्याचा केवळ हा एकच संकल्प केलात तरी त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर दिर्घकाळ राहतील याची खात्री बाळगा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष चांगले गाजवून टाका..

- Sandeep Daange
Business Coach | Marketing Strategist

30/09/2018

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when ESVC Super Helios posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share