18/08/2026
एकाग्रतेची जननी शांतता - ऑडिओलॉजिस्ट डॉ. कल्याणी मांडके (संस्थापक,मांडके हिअरींग सर्विसेस , पुणे)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांस व्यासपीठ मिळण्याच्या उद्देशाने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे दरवर्षी मुक्तछंद ह्या उपक्रम घेण्यात येतो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रांगोळ्या , पेन्सिल स्केचेस, कॅनव्हास पेंटिंग, कविता , ब्लॉग्स अशा विविध प्रकारच्या कला प्रदर्शित केल्या जातात. ह्या वेळच्या मुक्तछंदचे विशेष आकर्षण होते ध्वनिप्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम रांगोळीतून व्यक्त करणे. ह्या अनोख्या उपक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट डॉ. कल्याणी मांडके() ह्यांच्या शुभहस्ते झाले. समाजाच्या श्रवण स्वास्थ्यासाठी जी व्यक्ती आपले उभे आयुष्य झोकून देते अशी व्यक्ती ह्या अनोख्या उपक्रमाच्या उदघाटनास लाभणे हा खरोखरच दुग्धशर्करा योग.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. कल्याणी जोशी ह्यांनी डॉ. मांडके ह्यांचे स्वागत केले आणि ह्या प्रदर्शनामागील उद्देश विशद केला. छोट्या छोट्या विचारातून एखादा मोठा संकल्प कसा साकारला जाऊ शकतो ह्याबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. मांडके यांनी ध्वनी प्रदूषणाची मूलभूत संकल्पना स्पष्ट करून सत्राची सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, ध्वनी स्वतःहून हानिकारक नसतो. मात्र, तो गरजेपेक्षा जास्त आणि अस्वस्थ करणाऱ्या पातळीपर्यंत वाढविला गेल्यास समस्या निर्माण होते. आपल्या सभोवतालचा वातावरणीय आवाज जास्त असल्यामुळे संवाद साधताना आपण नकळत मोठ्याने बोलू लागतो. हा नकळत आपल्या ध्वनिपटलावर होणारा परिणाम आहे.
मुक्तछंद २०२६ या उपक्रमाशी सांगड घालताना डॉ. मंडके यांनी कला आणि सर्जनशीलतेमध्ये शांततेचे महत्त्व अधोरेखित केले. कोणतीही कला निर्माण करण्यासाठी तसेच तिचा आस्वाद घेण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते आणि एकाग्र विचार व सर्जनशीलतेसाठी शांत वातावरण महत्त्वाचे असते, अतिप्रमाणातील ध्वनीमुळे एकाग्रता भंग होऊन आपल्या अनुभवांची गुणवत्ता कमी होऊ शकते. डॉ. मांडके यांनी सार्वजनिक आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या डीजे सिस्टीम, लाऊडस्पीकर आणि एकत्रितपणे ढोल वापराबाबत नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे भविष्यात श्रवणशक्तीस धोका निर्माण होऊ शकतो कि जो आपल्याला लगोलग दिसून येत नाही. सातत्याने इअरबड्स आणि हेडफोन्सचा प्रमाणाच्या बाहेर आणि मोठ्या आवाजात वापर करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केले. अतिप्रमाणातील ध्वनीमुळे होणारी श्रवणशक्तीची हानी अनेकदा जबाबदार वर्तनाद्वारे टाळता येऊ शकते. डॉ. मांडके यांनी विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणात आपल्या स्वतःच्या योगदानाची जाणीव ठेवण्यास आणि केवळ वैयक्तिक सोयीपलीकडे विचार करण्यास श्रोत्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. संज्योत ठुसे ह्यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सौ. श्रेयसी वाटवे ह्यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्या डॉ. सौ. सुहासिनी इटकर व उपप्राचार्या डॉ. सौ. रुपाली कामथे , सर्व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. प्रा. हृषीकेश शिर्के , श्री. जयराम गांगुर्डे , प्रा. नेर्लेकर , प्रा. गिरीश महामुनी, प्रा. सौ. नरेगलकर, प्रा. सौ. कासनगोट्टूवार ह्यांनी परीक्षण केले.